समष्टीबद्दल थोडंसं…

समष्टी ही विश्वव्यापी संकल्पना मराठी भाषेत खऱ्या अर्थानं रुढ केली, ती महाकवी नामदेव ढसाळ यांनी. त्यांचं स्वप्न होतं समष्टीचं. समष्टीच्या साध्याचं. सार्वत्रिक समष्टीची अपेक्षा बाळगणाऱ्या या महाकवीची इच्छाही तशीच होती. त्यानं पाहीलेलं जग इतकं भयानक होतं, की त्यानं व्हिजुआलाईज केलेल्या जगाच्या निर्मितीसाठी आधी सारं काही उध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नव्हता. माण्सं ज्या ज्या कोनात विभागली गेली आहेत, ते सारे कोन एकसाथ उद्धवस्त व्हावेत आणि त्यानं नव्याने पृथ्वीवर श्वास घ्यावा. अशा वेळी एकसंध असा फक्त माणूसच जीवंत असेल. त्याला जात-वर्ग-धर्म-लिंग-वर्ण-पंथ पैकी पैकी कसलाही गंध असणार नाही. तो फक्त माणूस म्हणूनच जगेल.

जेथे नव्या विश्वाच्या निर्मितीची आस असेल आणि भेदभावाला कोणताही थारा नसेल. सर्वत्र विकासाच्या, उत्कर्षाच्या समान संधी असतील. सृष्टी, विश्व, जैवसंपत्ती यांचं कोणीही हनन करणार नाही. कुठलाही माणूस पृथ्वीवर बलात्कार करणार नाही. तिचा विध्वंस न घडवता तिचा सहोदर म्हणून सुखा समाधानाने जगेल, अमानुषतेची सगळी पुटं झाडून केवळ माणूस म्हणून जगेल अशा जगाचं स्वप्न पाहीलेल्या नामदेव ढसाळ यांनी हे सारं स्वप्न 'समष्टी' या एका शब्दात बांधलं होतं.

समष्टी या संज्ञेसाठी बरेच एप्रोचेस आहेत. हिंदू दर्शनशास्त्रात समष्टी या शब्दाचा अर्थ समुहावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी सामुहिक पद्धतीने केली जाणारी प्रार्थना म्हणजे समष्टी. जैन दार्शनिक याच्या पुढे जात केलेल्या प्रार्थनेनंतर मिळालेल्या सकारात्मक फळास समष्टी मानतात. राज्यशास्त्राच्या अनुषंगाने समष्टीचा अन्वयार्थ विविध, विभिन्न रंगाढंगानी युक्त असलेल्या समुहासारखे अनेक समुह एकत्र करून त्यास राष्ट्र नावाच्या आयडेंटीटीत बांधण्याच्या क्रियेस समष्टी म्हटले जाते. तर, डाव्या विचारांनुसार अर्थ लावायचा झालाच तर, समष्टीचा थेट अर्थ होतो तो सर्वांचे. सर्व प्रकारच्या हक्कांचे, अधिकारांचे आणि कर्तव्यांचे समान वाटप आणि काटेकोर पालन. तसेच समुहात उपलब्ध असलेल्या संपत्तीचे समान वाटप व उपलब्ध इतर संपत्तीचे मालकत्व समुहाकडे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक वा सामाजिक विषमतेची बीजेच शिल्लक राहणार नाहीत.

आणि, आंबेडकरी साहित्याच्या दर्शनशास्त्रात याचा अर्थ थेट.. स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय आणि संविधान प्रत्येकास मिळावे.. प्रत्येकाच्या आयुष्याचे संविधान व्हावे…

सारं काही समष्टीसाठीचे प्रयोजन…

मराठी साहित्याच्या साचलेपणाविरूद्धचा समर्थ द्रष्टा हा उच्चार आंबेडकरी साहित्याच्या अभिव्यक्तीचा आहे. आज हीच अभिव्यक्ती सर्जनशीलतेतील विधायक द्रष्टेपण संपवून, अगतिकतेच्या गर्तेत गटांगळ्या खाताना दिसते आहे. दलित साहित्याला कालातीत होण्याची सकस वांडमयीन भूमी आहे. गेल्या दशकात बोटावर मोजण्याइतके सोडले तर सौंदर्य़वाद, अभिजातवाद, गुढवाद, रोमँटिसीझम, वास्तववाद, अतिवास्तववाद, अभिव्यक्तीवाद, अस्तित्ववाद, मार्क्सवाद, फॉर्मालिजम, रुपवाद, संरचनावाद, मनोविश्लेषणात्मक साहित्यनिर्मिती आपल्याकडे झालीच नाही असे नाही. पण त्यात नावीन्य कुठेय… आंबेडकरी साहित्यात आणि साहित्यिकात त्या सर्जनशीलतेची शक्यता ठासून भरलेली आहे.

पूर्णतः सुखवस्तू वातावरणातून आलेल्या नवख्या पोरांना जे आता कुठे तारुण्याच्या उंबरठ्यावर भौतिकवादाची छानछौकी अनुभवत आहेत अशा लुंग्या सुंग्याची रायवळ जत्रा मोठ्या प्रमाणावर भरली आहे. त्यांचा कल स्वतःस प्रस्थापित म्हणवण्याकडे आहे. ज्यांचे डोळे मोतिबिंदू झालेले नव्या अभिव्यक्तीतील सत्यम शिवम सुंदरम पाहू शकत नाहीत. उच्चजातीय सौंदर्य हे आपले सुद्धा सौंदर्य असले पाहीजे असा कयास बाळगणारे डोळे आणि मेंदू आहेत. हेच साचलेपण हळूहळू विस्तारत चालले आहे. याच प्रस्थापितांना असत्याचा, अशिवाचा, कुरूपाचा नी नवरसातील बीभत्सपणाचा नॉशिया आहे. आता या नॉशियाचा गंड जपणाऱ्या याच नवख्यांनी एकुण साहित्याला गंज लावला आहे.

युरोपातील, अमेरिकेतील देश चित्रकला, आणि कवितेच्या अंगाने इंप्रेशनिझम, सिंबॉलिजन, सिंथेटिझम, फॉविझम, क्युबिझम, फ्युचरिझम करत करत आपल्याहून 100 वर्षे पुढे निघून गेला आहे. कवितेचा पॉप, झ्रॅप, झॅज, रॅप होऊ शकतो हे त्यांनी करून दाखवले.

दूर्दैवाने नव्वदोत्तरीतील हे बिरूद मिरवणाऱ्यांनी सत्तरीतील साहित्याची गाडी पुढे ओढण्यापलीकडे काही फारसे काम केलेले दिसत नाही. त्यांनी कवितेचा तोच फॉर्म कायम ठेवला. नवीन फॉर्म बनवले नाही. कवितेचं चित्र केलं नाही. चित्रांची कादंबरी केली नाही. कादंबरीचे सिनेमे केले नाहीत. गेलाबाजार स्वतःच्या आत्मकथनांचा, कादंबऱ्यांचा, कथा-कवितासंग्रहांचा महापरिनिर्वाण दिन वगळता मार्केट उभा केला नाही. एकविसाव्या शतकाची कविता लिहीण्याची धमक अरुण काळेंनी दाखवली. 92 नंतर आलेल्या जागतिकीकरणाने आधुनिकतेच्या नावाखाली प्रसवलेल्या नव्या विषमतेच्या गढ्यांना मानवी चेहरा दाखवून त्यास नागवे करण्याचे काम फक्त अरुण काळेंच्याच कवितेने व्हावे ही खेदाची गोष्ट होती.

पोस्ट ग्लोबलायझेशनच्या कालखंडात युरोपीयन गीत-संगीत-लेखन-कविता आणि सादरीकरणाचे प्रकार पाहण्याचे, वाचनाचे, ऐकण्याचे मोफत दालन इंटरनेटने उपलब्ध करून दिले. त्यातून जन्मास आले नवनव्या कलाविष्कारांना आपलंसं करणारे कलाकार. त्यांनी साहित्य म्हणजे फक्त पानावर लिहीलेले साहित्य हा समज खोडायला घेतला. काय नाही त्यांच्याठायी.. या तरूणांच्या साहित्यात स्वच्छंदवादाची, वास्तववादाची, घनवादाची, अभिजातवादाची, अतिवास्तववादाची सर्व लक्षणे सापडतील. त्यांच्या साहित्य निर्मितीचा प्रभाव, प्रेरणा आणि बलस्थान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अंतर्विरोधी प्रभावातून आणि संघर्षातून आलेला आहे.

पण या सर्व नव्या दमाच्या कलाकारांना हक्काचे स्थान नाही. हक्काचे मंच नाही. नवीन मंच उभे करावे तर त्यासाठीची आर्थिक भाग भांडवलाची तरतूद नाही. कुणी करावे कर्ज-द्रव्य खर्चून तर वेळेचा अभाव… या सर्व अभावांसाठीचे एकमात्र कारण इच्छाशक्तीचा अभाव. अशा वेळेस कवितेस सिरीअसली घेणे गरजेचे असते. एक तर तुम्ही कविताच लिहू शकता. किंवा तुम्ही फक्त कवितेचे आयाम बदलवणारा, सृजनतेला मोकळं आभाळ मिळवून देणारा मंच उभारू शकता.

आम्ही सर्वांनी मिळून हा मंच उभा करण्याचे योजले आहे. मान्य आहे, ही जागा, मंच, लोक सध्या रांगतायेत. धडपडताहेत. चुकताहेत, सावरताहेत, फसतायेत, पण जमीनीत खोल मुरतायेत. त्यांची कविता, त्यांचे प्रकार, त्यांच्या योजना सर्व तरूण आहेत. त्या ऊन्हात तापून लख्ख होतायेत. त्यांच्या कविता, गीत संगीत रॅप बिप सर्व काही परंपरावाद्यांच्या पचनी पडणारं नसलं तर परंपरा मोडणाऱ्यांना फारसं पटतंय असं नाही. पण, प्रयत्न जोरदार आहे, ते सतत हॅमर होत राहील. आणि एक दिवस ते तुम्हाला कळू लागेल. मग आवडू लागले. मान्य आहे, मुलं मुली उभे राहतात, चित्र काढतात, रंगवतात.. त्यांचे विषय वेगळे आहेत. पण, त्यांनी कवितेचं चित्र बनवलं आहे. चित्रांचा सिनेमा बनवत आहेत. समाजात असलेलं सर्व सुष्ट आणि दूष्ट ब्रशच्या फटकाऱ्यांत उभं करत आहेत. आता त्यांच्या प्रेरणा युरोप अमेरिका रशियातून येत नाहीत. इथेच आहेत. आंबेडकर आहे.

चऴवळी, कलाकार, कार्यकर्ते, समाज, माणसे, वाद. विचार, विवाद, राष्ट्र, संविधान हातात हात घालून घडत असतात.

आपल्यालाही आपल्याच हातांतून प्रेरणा मिळेल असे कार्य आत्ताच्या पीढीने पुढच्या पीढीसाठी करवून ठेवायचे आहे. या साहित्याची पूर्वअट नकार आणि विद्रोह आहे. त्याच मार्गाने वाटचाल योजावयाची आहे. विद्रोह ही अवस्था आहे. ती बदलते. वैज्ञानिक अर्थाने अपटूडेट व्हायला हवे. आता आम्हास नुसते भाष्यकार व्हावयाचे नाही. पुन्हा एकदा गूढवादात अडकलेले, अज्ञेयतेकडे झुकलेले आणि अदृष्य कर्विपाकाच्या अभिव्यक्ततेकडे झुकलेले साहित्य निर्मायचे नाही आहे.

समता-बंधुता विज्ञान आमच्या कलाकृतीचा पाया आहे असे म्हणत, पुढे जायचे आहे. भूत वर्तमान भविष्य यामधल्या सूर बदसूरांची सिंफनी बनवण्याचे काम साधायचे आहे.

व्यक्ती, समष्टी, सृष्टी, षड्विकार, वाद, तत्वज्ञान यांचा केंद्रबिंदू माणूस असतो. याच माणसाला पुन्हा मोठे करायचे आहे. तो बिंदू साधायचा आहे. हा बिंदू म्हणजेच समष्टी. या समष्टीसाठीचा अट्टाहास आणि त्यातून फुलणारा कलाविष्कार म्हणजेच.. सारं काही समष्टीसाठी..

हे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे
अनामवेळी फुटू द्यावे ,रिचू द्यावे.
नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये,
लुटू नये
काळा गोरा म्हणू नये
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
अाभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी माणून
त्यांच्या कुशीत गुण्यागोविंद्याने राहावे
चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वांनी कांडून खावा
माणसावरच सुक्त रचावे
माणसाचेच गाणे गावे माणसाने.

सारं काही समष्टीसाठी २०२२ … लवकरच येत आहोत…